समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविताना ट्रक रस्त्याकडेच्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात चालक केबिनमध्ये अडकून पडला. स्थानिकांसह अग्निशामक दलाने अनेक तास प्रयत्न करुन त्याला वाचविल्याची घटना नुकतीच शिंगरगावमध्ये (ता. जोयडा) घडली. जोयडा-जगलबेट मार्गावर हा अपघात झाला. शाहिद नायकवाडी (वय २४) असे जखमी चालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोव्याहून दांडेलीकडे जाणाऱ्या एका ट्रकने समोरुन येणाऱ्या वाहनाला चुकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नियंत्रण गमावलेल्या ट्रकने रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, केबिनचा चक्काचूर होऊन चालक गंभीर जखमी अवस्थेत त्यात अडकून पडला. स्थानिक रहिवासी आणि अग्निशामक दलाने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अनेक तासानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून रामनगर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



