पूर्ववैमन्यस्यातून खानापूर येथील एकाचा खून करणाऱ्या बाप-लेकाला चौथे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रशांत दत्तात्रेय नार्वेकर आणि दत्तात्रेय उर्फ दत्तू काशिनाथ नार्वेकर, दोघेही राहणार आश्रय कॉलनी, बाहेर गल्ली, खानापूर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
मारुती उर्फ कृष्णा गणूराव जाधव, राहणार बाहेर गल्ली, खानापूर असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी प्रशांत हा मारुती यांची पत्नी मेघा यांच्याकडे वाईट नजरेने पाहण्यासह सतावत होता. ही बाब पती मारुती यांना समजल्याने त्यांनी आरोपीला शिवीगाळ करून मारहाण केली होती. तेव्हापासून आरोपीने मारुती
यांच्यावर राग धरला होता. ३० सप्टेंबर २०२२ रोजी मारूती घरासमोर वॉकिंग करत होते. त्यावेळी त्यांचा खून करण्याच्या उद्देशाने दोघा बाप-लेकांनी लाकडी रिप, चाकू, कुन्हाड आणि तलवारीने हल्ला करून खून केला. इतकेच नव्हेतर साक्षीदार शुभांगी कवळेकर यांना धमकी दिली. याप्रकरणी पत्नी मेघा यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने खानापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. तत्कालीन तपास अधिकारी सुरेश शिंगी आणि मंजुनाथ नायक यांनी न्यायालयात दोषारोप दाखल केले. न्यायालयात आरोपींवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश संध्या यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. डी. एच. ओस्वाल यांनी काम पाहिले



