देवाच्या नावाने महाप्रसादासाठी पैसे जमा करणाऱ्या
एका भोंदू बाबाला नागरिकांनी चोप दिल्याचा प्रकार महाद्वार रोड परिसरात घडला. घरोघरी जाऊन या भोंदूने महाप्रसादासाठी पैसे जमा केले होते. मद्यप्राशन करून तो देणगी जमा करीत असल्याचे लक्षात आल्याने काही तरुणांनी त्याची चौकशी केली असता तो भोंदू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या तरुणांकडून भोंदू बाबाला चोप देण्यात आला.
सध्या देवाच्या नावावर आपले पोट भरण्यासाठी अनेकांचे उपद्व्याप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मद्यप्राशन करून अशाच प्रकारे देणगी जमा करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी
बोप दिला होता. मंगळवारी महाद्वार रोड, संभाजी गल्ली परिसरात एक व्यक्ती महाप्रसादासाठी पैसे जमा करीत होती.
घरातील वयोवृद्ध महिलांनी श्रद्धेपोटी आपल्याकडे असलेली रक्कम त्याच्याकडे दिली. परंतु त्याच सत्संगातील एका तरुणाने त्या भोंदूला हटकले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे
देणाऱ्या त्या भोंदूने अखेर आपण मद्यप्राशन केले असल्याचे सांगितले तसेच आपण कोणत्याही सत्संगाचा नसल्याचेही
त्याने स्पष्ट केले. त्यामुळे देवाच्या नावावर मद्यप्राशन करून पैसे जमा करणाऱ्या त्या व्यक्तीला तरुणांनी चोप दिला. सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे



