गोवा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये भाजपचा जनादेश खंडित होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने काँग्रेस पक्षाचे संकटमोचक आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी 8 मार्च रोजी गोव्यात धाव घेतली.
शिवकुमार हे काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार विशेष विमानाने गोव्याला रवाना झाले, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात गोवा विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात झाली होती.
४० सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा २१ चा आकडा कोणताही पक्ष गाठू शकला नसला तरी सर्वच एक्झिट पोलने भाजपला जनादेश मिळणे कठीण असल्याचे म्हंटले आहे. गोव्यात काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
गोव्यातील कॉंग्रेसचा प्रचार पक्षाचे सरचिटणीस आणि केपीसीसीचे माजी अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी सांभाळला होता.
आता शिवकुमार कमीतकमी तीन दिवस गोव्यात तळ ठोकून राहतील. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार ते 9 मार्च रोजी पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहणार आहेत आणि 10 मार्च रोजी निवडणूक निकालांवर लक्ष ठेवणार आहेत.
सत्ताधारी भाजपकडून ‘शिकार’ करण्याच्या कोणत्याही प्रयत्नापासून काँग्रेस पक्षाच्या आमदारांचे संरक्षण करणे हे महत्वाचे काम त्यांच्यावर आहे.
2017 मध्ये,शिवकुमार यांनी गुजरातच्या 44 कॉंग्रेस आमदारांचे बिदडी येथील एका रिसॉर्टमध्ये संरक्षण केले होते, यानंतर त्यांना आयकर खात्याच्या छाप्यांचा सामना करावा लागला होता. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू न शकल्याने कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीसाठी त्यांनी प्रयत्न करून यशस्वी केले. केपीसीसीचे कार्यकारी अध्यक्ष सतीश जारकीहोळी हेदेखील काल गोव्यात दाखल झाले आणि सरकार स्थापन होईपर्यंत ते तेथेच राहणार आहेत.