युक्रेनमधील असंख्य भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण मिळाला आहे. युद्धाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे अपूर्ण वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परत जाण्यास भाग पाडले गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट असल्याने कर्नाटकातील अभिमत विद्यापीठांच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकातील कन्सोर्टियम ऑफ डीम्ड युनिव्हर्सिटीजचे (कोडयुनिक) चे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे(केएलई सोसायटी बेळगावचे अध्यक्ष) यांनी याबद्दल एक आश्वासक घोषणा केली आहे. देशाप्रती त्यांचे कर्तव्य म्हणून, कन्सोर्टियम अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.असे ते म्हणाले.
केएलई विद्यापीठाचे कुलपती असलेले डॉ. कोरे यांनी बेळगाव केसरी न्युज ला सांगितले की, यासंदर्भात एक बैठक झाली ज्यात सर्व तांत्रिक व शैक्षणिक बाबींवर चर्चा झाली आणि या विद्यार्थ्यांना कोडयुनिक अंतर्गत येणाऱ्या कर्नाटकातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
युक्रेनमधील प्रतिकूल परिस्थितीत ज्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात परतण्यास भाग पाडले गेले होते, त्यांना त्यांच्या पालकांसह कोंडीचा सामना करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना सामावून घेणे हे आपले कर्तव्य आहे, तथापि, या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कसे प्रवेश देता येतील याचा निर्णय भारत सरकारने घेतला पाहिजे,” असे डॉ. कोरे म्हणाले.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील राष्ट्रांसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे आव्हान अधिक आहे.
“भारत सरकारने भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले. युक्रेनमधून अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आता या विद्यार्थ्यांना सामावून घेणे हे आमचे कर्तव्य आहे,’ असे डॉ. कोरे यांनी सांगितले.
तथापि, भारत सरकारने यासंदर्भातील सूचना आणि नियम जारी केले पाहिजेत, असे सांगून ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी धीर सोडू नये त्यांच्या चिंता दूर केल्या जातील आणि त्यांचे भविष्य सुरक्षित केले जाईल याची खात्री बाळगावी.