लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी बुधवारी सौंदत्ती तालुक्यातील मुरगोडच्या उपनिबंधकांना लाच मागितल्याच्या आरोपाखाली सापळा रचून पकडले आहे. वडिलोपार्जित मालमत्ता वाटणीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी लाच मागण्यात येत होती. उपनिबंधकांच्या वतीने लाच घेणारा स्टॅम्प रायटर पैसे स्वीकारणार होता.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उपनिबंधक संजीव वीरभद्र कपाळी आणि स्थानिक मुद्रांक लेखक शिवयोगी शंकरय्या मल्लायनवर यांना रंगेहाथ पकडुन अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे. मुरगोड येथील शिवाप्पा मुत्तेप्पा वरगन्नावर यांनी मालमत्तेची कागदपत्रे देण्यास अनावश्यक विलंब करून लाच मागितल्याप्रकरणी उपनिबंधकांविरुद्ध एसीबीकडे तक्रार दिली होती.
तक्रारीच्या आधारे छापे टाकणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडले. एसीबीचे एसपी (उत्तर विभाग) बी.एस.नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीवायएसपी करुणाकरशेट्टी आणि निरीक्षक ए. एस. गुडिगोप्प यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला व कारवाई करण्यात आली.