No menu items!
Thursday, December 5, 2024

खानापूर तालुका म ए समितीतर्फे यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

Must read

कै. सीमासत्याग्रही नागाप्पा होसुरकर यांच्या धर्मपत्नी कै. श्रीमती नर्मदा होसुरकर व समिती नेते कै. नारायण मल्लाप्पा पाटील कुप्पटगिरी यांना खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने निडगल येथे सोमवार दिनांक १४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी निडगल गावाचे सुपुत्र सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री. एम. पी. कदम होते. प्रास्ताविक निडगल गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री गणपतराव पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रवीण पाटील, नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील यांनी केले.

प्रथम कै. नर्मदा होसुरकर यांच्या प्रतिमेस सीमासत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण व सीमसात्याग्रही नारायणराव लाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबरराव पाटील म्हणाले हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांचा भाषावार प्रांतरचना १९५६ ला झाली त्यावेळेच्या आंदोलनात हिंडलगा कारागृहात कर्नाटकी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यु झाला, त्यावेळी कै. नर्मदा नागाप्पा होसुरकर यांचे लग्न होऊन ४-५ महिन्याचा कालावधी देखील झाला नव्हता. या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या वयातच त्यांना वैधव्य प्राप्त झाले, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

संपूर्ण आयुष्य गेली ६६ वर्षे त्यांनी सीमाप्रश्नासाठी वैधव्यात घालविले. तत्कालीन आमदारांनी नर्मदाबाईना ५-६ एकर जमीन त्यांच्या चरितार्थासाठी सरकार कडून मिळवून दिले. कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या अनेक हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारकडून पेन्शन मिळवून दिली, त्यामध्ये नर्मदाबाई होसूरकरना पेन्शन मिळवून दिली. पतीनिधना नंतर नर्मदाबाईनी आपल्या माहेरी निडगल येथे आपले उर्वरित आयुष्य घालवले. अशा या थोर सीमातपास्विनी नर्मदाबाईंचे निधन १० मार्च २०२२ रोजी निडगल मुक्कामी झाले, त्यांच्या हयातीत निडगलच्या चोपडे कुटुंबीयांनी जीवनभर त्यांना आधार दिला व सेवासुश्रुषा केली.

अशा थोर भगिनीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दिगंबर पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली तसेच कुप्पटगिरीचे म. ए. समितीचे लढवय्ये नेते नारायण मल्लाप्पा पाटील माजी मंडळ पंचायत प्रधान, भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन, भावकेश्वरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन यांचे ११ मार्च २०२२ रोजी कुप्पटगिरी येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनाही खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी सीमासात्याग्रही पुंडलीकराव चव्हाण व सीमासत्याग्रही नारायणराव लाड यांनी कै. नागाप्पा होसुरकर यांच्या समवेत भोगलेल्या तुरुंगवासातील आपल्या अनुभवाचे कथन केले. या प्रसंगी जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगांवकर, म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, माजी नगरसेवक अनिल पाटील, माजी नगरसेवक विवेक गिरी, नंदगड मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पी के पी एस सोसायटीचे संचालक शंकर पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य विठ्ठल गुरव व महादेव घाडी, गोपाळ देसाई, बाबुराव पाटील गुरुजी, प्रकाश चव्हाण, राजू पाटील नंदगड इत्यादींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अध्यक्षीय भाषणात श्री. एम. पी. कदम यांनी निडगल गावच्या वतीने श्रद्धांजली वाहिली, यावेळी अनेक वक्त्यांनी दुभंगलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती एकच झेंड्याखाली एकत्र यावी, समितीला गतवैभव प्राप्त करून द्यावे व सीमाप्रश्न सोडविण्याची शपथ घ्यावी तरच आजची श्रद्धांजली खरी ठरेल असे प्रतिपादन केले. म. ए. समितीचे कार्यकर्ते शामराव पाटील, रुकमाना झुंजवाडकर, विश्वास पाटील, तानाजी कदम, राजाराम पाटील, दिगंबर देसाई, शशिकांत कदम, नागेश चोपडे, सुरेश चोपडे, परशराम कदम, अरुण पाटील कुप्पटगिरी तसेच निडगल व कुप्पटगिरी गावचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!