किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीसाठी व नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून नाचणा, भात खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भात खरेदीला सुरुवात होणार असून जानेवारी २०२६ पासून बाजरी व ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे.
राज्यभरात ९५ केंद्रे उभारण्यात आली आहेत. येत्या काळात आणखी केंद्रे सुरू करण्यात येणार असून अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चालू वर्षात ६ लाख मेट्रिक टन नाचणा, ३ लाख मेटिक टन भात, ३ लाख मेट्रिक टन ज्वारी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पिकासाठी सर्वेक्षण केलेले शेतकरी नोंदणीकेंद्रावर येऊन नोंदणी करू शकतात. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त ५० क्विंटल नाचणा विकण्याची मुभा असणार आहे.दरवर्षी खरेदी केंद्रे सुरू करण्यास होणारा विलंब, आवश्यक तयारीचा अभाव, वेळापत्रक उशिराने प्रसिद्ध करणे, गोडावूनसाठी योग्य जागेचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परिणामी गेल्यावर्षी धान्य खरेदी करणे विभागाकडून शक्य झाले नाही. गेल्या वर्षीसारख्या त्रुटी राहू नयेत, यासाठी आतापासूनच अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून तयारी करण्यात येत आहे. यासाठी जास्तीत जास्त केंद्रे सुरू करण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहणार आहे.एमएसपी योजनेंतर्गत अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून केवळ बाजरी, भात, नाचणा, ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे. तर कृषी खात्याकडून मका, तूर, हरभरा, उडीद, भूईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ खरेदी करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना योजनेच्या नियमाप्रमाणे पिकांची विक्री करता येणार आहे.
अन्न-नागरी पुरवठा खात्याकडून योजना-राज्यात पीक खरेदी नोंदणी केंद्रे सुरू
