तिथी : प्रांतानुसार फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा ५-६ दिवस, काही ठिकाणी २ दिवस, काही ठिकाणी ५ दिवस उत्सव साजरा केला जातो.
इतिहास :
अ. प्राचीन काळी ढूंढा अथवा ढौंढा नावाची एक राक्षशीण गावात येऊन लहान मुलांना त्रास देत असे. ती रोग निर्माण करत असे. तिला गावातून बाहेर घालण्यासाठी लोकांनी पुष्कळ प्रयत्न केला; परंतु ती गेली नाही. तेव्हा नारद मुनींनी सम्राट युधिष्ठिराला एक उपाय सांगितला. तोच होलिका महोत्सव ! (स्मृतिकौत्सुभ – भविष्योत्तर पुराण)
आ. उत्तरेकडे होळीच्या आधी ३ दिवस बालकृष्णाला पाळण्यात घालून त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौणिमेला पुतनेची प्रतिकृती सिद्ध करून ती रात्री जाळतात.
इ. एकदा भगवान शंकर तपाचरणात मग्न असताना ते समाधीत होते. तेव्हा मन्मथाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. ‘माझा तपोभंग कोण करत आहे ? असे वाटून शंकराने डोळे उघडून पहाताच मन्मथाकडे त्याची दृष्टी गेली आणि तो जळून खाक झाला.’ दक्षिणेकडील लोक कामदेवाच्या दहनासाठी हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मन्मथाची प्रतिमा करून त्याचे दहन करतात. या मन्मथाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; त्यासाठीच होळी हा उत्सव आहे.
पद्धत :
स्थान आणि वेळ : देवस्थानासमोर अथवा योग्य अशा ठिकाणी पोर्णिमेला संध्याकाळी होळी पेटवतात. शक्यतो ग्रामदेवतेच्या समोर होळी रचण्यात येते.
आ. कृती : मधे एरंडाचे झाड, नारळाचे झाड, सुपारीचे झाड अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती शेण्या आणि काटक्या रचतात. होळीपूजन करणारा शुचिर्भूत होऊन देश-काल कथन करून ‘‘सकुटुंबस्य मम ढूंढा राक्षसी प्रीत्यर्थं तत्पीडा परिहारार्थं होलिका पूजनं अहं करिष्ये ।’’असा संकल्प करून पूजा करून नैवेद्य दाखवावा.
नंतर ‘होलिकायै नम: ।’असे म्हणून होळी पेटवावी. त्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालावी. उलट्या हाताने बोंब मारावी. होळी संपूर्ण जळून गेल्या नंतर दूध, तूप शिंपडून ती शांत करावी. त्यानंतर जमलेल्या लोकांना नारळ, नीरफणस इत्यादी फळे देऊन ती रात्र नृत्य- गायनात घालवावी. दुसर्या दिवशी सकाळी होळीच्या राखेला वंदन करावे. ती राख अंगाला लावून स्नान करावे. त्यामुळे आधी-व्याधींचा त्रास होत नाही. (आधी म्हणजे मानसिक व्यथा किंवा त्रास, व्याधी म्हणजे रोग) सकाळी अश्लील बोलून होळीच्या रक्षेचे विसर्जन करावे. त्यानंतर होळीची प्रार्थना करावी.
आ १. बोंब मारणे याचा अर्थ : फाल्गुन पौर्णिमेला पूर्वा फाल्गुन नक्षत्र येते. भग देवता त्या नक्षत्राची देवता आहे. भगचा प्रचलित अर्थ आहे जननेंद्रिय म्हणजे स्त्रीचे जननेंद्रिय त्यामुळे भगच्या नावाने बोंब मारायची. ही एक प्रकारची पूजाच आहे. त्या देवतेचा तो सन्मानच आहे, असे समजले पाहिजे. काही ठिकाणी होळीची राख, शेण, चिख्खल इत्यादी शरीराला फासून नाच करण्याची पद्धत देखील आहे.
धूलीवंदन
तिथी : फाल्गुन कृष्ण प्रतिपदा.
पूजा : या दिवशी होळीच्या राखेची, धुळीची पूजा करतात. पूजा झाल्यावर खाली दिलेल्या मंत्राने तिची प्रार्थना करतात.
वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवी भूते भूतिप्रदा भव ।।
अर्थ : हे लक्ष्मी, तू इंद्र, ब्रह्म आणि महेश्वरांकडून वंदित आहेस; त्यामुळे हे ऐश्वर्यवती देवी, तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर.
रंगपंचमी
तिथी : फाल्गुन कृष्ण पंचमी. ( अलीकडे काही ठिकाणी होळीच्या दुसर्या दिवशीच रंगपंचमी साजरी करतात.)
उत्सव : या दिवशी इतरांवर गुलाल, रंगीत पाणी इत्यादी टाकतात.
होलिकोत्सवातील अयोग्य पद्धती थांबविणे हे आपले धर्मकर्तव्य आहे !
सध्या होळीच्या निमित्ताने अयोग्य पद्धती येत आहेत. उदा. बलपूर्वक पैसे वसूल करणे, इतरांची झाडे कापणे, वस्तू चोरणे, दारू पिऊन गोंधळ घालणे तसेच रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांवर घाण पाण्याचे फुगे टाकणे, अपायकारक रंग अंगाला फासणे या अयोग्य पद्धतींमुळे धर्म हानी होते. त्या थांबविणे हे आपले धर्मकर्तव्य आहे. त्यासाठी समाजाचे प्रबोधन करा !
( आधार : सनातन संस्था निर्मित ग्रंथ ‘सण साजरे करण्याची योग्य पद्धत आणि शास्त्र’)
आधार : Sanatan.org/kannada
संग्रह :
श्री. विनोद कामत
राग्य प्रवक्ता, सनान संस्था
संपर्क : ९३४२५९९२९९