पोलिसांनी वकिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची घटना आज गुरुवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी रात्री कॅम्प येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.सदर भांडण त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कांही वकिलांनी सोडवून मारामारी करणाऱ्या युवकांना समजावून त्यांच्या वाटेने पाठवून दिले. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळाल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या कॅम्प पोलिसांनी व्यवस्थित चौकशी न करता मध्यस्ती करून भांडण सोडविणाऱ्या वकिलांनाच मारबडव केल्यामुळे समस्त वकील वर्गात संताप व्यक्त होत आहे.
सदर घटनेच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनतर्फे आज गुरुवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. कामकाजावर बहिष्कार टाकण्याबरोबरच बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच वकिलांना मारहाण करण्याच्या पोलिसांच्या कृतीचा निषेध करणारे आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करतेवेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्तनट्टी, उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, सेक्रेटरी अॅड. जी. एन. पाटील, जॉईंट सेक्रेटरी अॅड. बंटी कपाई, अॅड. महांतेश पाटील, अॅड. उदोशी, अॅड. आर. सी. पाटील आदी वकील मंडळी उपस्थित होती.