द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधक या चित्रपटाबाबत आपापली मते व्यक्त करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाने या चित्रपटाची प्रशंसा केली असून विरोधकांनी मात्र भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. ही टीका करताना कर्नाटकात असलेल्या बेळगाव आणि सीमाभाग यांचा उल्लेख आल्याने त्याकडे लक्ष वेधले जात आहे.
आता शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बेळगावचा मुद्दा उपस्थित करत एक ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे राऊत यांनी भाजप आणि भाजप सरकारवर टीकेचे प्रहार केले आहेत.
खासदार राऊत यांच्या या ट्विटमध्ये … आणि बेळगाव फाईल्स काय कमी भयानक आहेत? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.बेळगावातील ज्येष्ठ व्यंग चित्रकार जगदीश कुंटे यांनी काढलेल्या कार्टून चा वापर करीत संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. या ट्विटमध्ये भाषिक गळचेपी, मराठी तरुणाची अवस्था आणि लोकशाहीचा खून करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.
खासदार संजय राऊत हे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत टीकास्त्र सोडत आहेत. काश्मीरची खरी फाईल काय हे बाळासाहेब ठाकरे यांना माहीत होते. महाराष्ट्राने युती सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग शिक्षणात ५ टक्के जागा राखीव ठेवल्या आणि हे देशात पहिल्यांदाच घडले, असे सांगत नुसते चित्रपट टॅक्स फ्री करून वेदना समजत नाहीत, असा टोला खासदार राऊत यांनी यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये लगावला आहे.
काश्मीर फाईल्समधे अनेक सत्यं दडवली गेली असून ‘ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटात लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा राबवण्यात आला. तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा असल्याची घणाघाती टीकाही खासदार राऊत यांनी केली आहे.
द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे सोडा, आम्ही जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट बनवला होता तेव्हा तो चित्रपटही आम्ही टॅक्स फ्री केलेला नव्हता, तरी सुद्धा लोक तो पाहण्यासाठी आले होते, असेही राऊत यांनी म्हटले आहे.