महाराष्ट्र–कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्न संपलेला आहे असे तुणतुणे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज वाजवत आधीच्या मुख्यमंत्र्यांची री ओढली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काश्मीर फाइल्सपेक्षा बेळगाव फाईल्सची जखम अधिक गंभीर असल्याचे दर्शविणारे व्यंगचित्र ट्विटरवर अपलोड केले आहे. त्यावर बंगळुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बेळगाव प्रश्नाचा निकाल लागला आहे. 1956 मध्ये भाषिक प्रांतरचना आयोगाच्या शिफारशीवरून सोलापूर, अक्कलकोट हा कानडी बहुल भाग महाराष्ट्राला देण्यात आला आहे. तसेच बेळगाव कर्नाटकात समाविष्ट केले आहे.
बेळगावचा प्रश्न उकरून काढत महाराष्ट्रातील समस्यांवरून जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न तेथील नेते करीत असतात असे बोम्मई म्हणाले. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीसाठी उत्तरप्रदेशला जाणार का या प्रश्नावर, 25 मार्चला त्यांचा शपथविधी आहे. आज सायंकाळी यावर निर्णय घेईन असेही त्यांनी सांगितले.