एमएलआरसीच्या परेड मैदानावर आज सकाळी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशाच्या विविध भागात देश सेवेसाठी रूजू होणाऱ्या बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर मधील एकूण 404 जणांचा दीक्षांत समारंभ दिमाखात पार पडला.
प्रारंभी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी परेडची पाहणी केली. त्यानंतर तिरंगा ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 404 जवानांना मातृभूमीच्या संरक्षणाची आणि वेळ पडल्यास त्यासाठी बलिदान देण्याची शपथ देण्यात आली.
त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ब्रिगेडियर जोयदीप मुखर्जी संस्थेचे महत्त्व विशद करताना शपथग्रहण केलेला जवानांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मराठा लाईट इन्फंट्री च्या समृद्ध आणि वैभवशाली वारसा ची माहिती देऊन भारतीय लष्करातील ही सर्वात जुनी इन्फंट्री असल्याचे यावेळी जवानांना सांगितले.
यावेळी दीक्षांत समारंभाची सांगता शर्कत युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून करण्यात आली. सदर दिक्षात समारंभास निमंत्रितांसाठी वरिष्ठ लष्करी अधिकारी जवान आणि शपथ ग्रहण करणाऱ्या जवानांचे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.