शहर परिसरात शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पसरले आहे गल्लोगल्ली शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या मुर्तीची स्थापना करून पूजन करण्यात येत आहे.
येथील गोंधळी गल्ली मध्ये श्री छत्रपती युवक मंडळ आणि श्री छत्रपती महिला मंडळ यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वार्ड क्रमांक 7 चे नगरसेवक शंकर पाटील उपस्थित होते यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी महिलांनी पाळणा गीत गायले. तर पोवाडा देखील गाण्यात आला. यावेळी युवकांनी ढोल ताशाच्या गजरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी श्री छत्रपती युवक महिला मंडळाच्या सदस्य आणि श्री छत्रपती युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच बाळगोपाळ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.