मुंबई दि.७ मे. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ४ व ५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धेत ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
ही स्पर्धा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टूनिस्ट कंबाईन या व्यंगचित्रकारांच्या संघटनेने संयुक्तरित्या आयोजित केली होती. विषय होता ‘ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'(war and peace) . या स्पर्धेत भारतातील ४४ तर विदेशातील १३६ व्यंगचित्रकारानी प्रत्येकी दोन दोन व्यंगचित्रे पाठवून भाग घेतला होता.
रशिया, ब्रिटन, युक्रेन, इराण इराक चीन पोर्तुगाल, सौदी अरेबिया इटली इंडोनेशिया थायलंड अमेरिका इजिप्त पोलंड क्युबा उझबेकिस्तन अझरबैजान म्यानमार अर्मेनिया अशा विविध देशातून स्पर्धेसाठी व्यंगचित्रे आली होती.
स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन संयुक्त महाराष्ट्र कला दालन शिवाजी पार्क मुंबई येथे भरले होते. दोन दिवसांच्या या व्यंगचित्र महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस समारंभ महाराष्ट्राचे उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.