शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाने 500 रुपयांची देणगी पावती फाडणार्या भाविकांना चौथर्यावर जाऊन तैलाभिषेक करू देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, जे भाविक 500 रुपयांची देणगी पावती फाडू शकणार नाहीत, त्यांना तैलाभिषेकाचा विधी करता येणार नाही. यातून विश्वस्त मंडळ गरीब भाविकांचा शनिदेवतेवर अभिषेक करण्याचा संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही एकप्रकारे भाविकांची आर्थिक लुबाडणूक आहे. हा निर्णय भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक यांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. भगवंत आणि भाविक यांच्यामध्ये बाधा निर्माण करण्याचा देवस्थान समितीला काय अधिकार ? धार्मिक नव्हे, तर आर्थिक हिताचे निर्णय घेणार्यांवर शनिदेवाची कधी तरी कृपादृष्टी होईल का? शनिदेवतेवर तैलाभिषेक करण्यासाठी 500 रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने त्वरित मागे घ्यावा; अन्यथा याला विरोध केला जाईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.
मंदिरांचे पावित्र्य जपण्यापेक्षा त्यांना व्यवसायाचे केंद्र बनवणे कितपत योग्य आहे ? कोरोनाच्या पूर्वीपर्यंत भाविकांना चौथर्यावर जाण्यासाठी शुल्क आकारले जात नसतांना अचानक हा निर्णय कसा घेतला ? देवतेची पूजा-अर्चा वा विधी करण्याविषयी देवस्थानची जी घटना बनवली आहे, त्यामध्ये मनमानीपणे बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही. विश्वस्त मंडळाचा हा अन्यायकारक निर्णय देवस्थानच्या घटनेला अनुसरून नाही, असे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांचे म्हणणे आहे.
देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाने सर्वांना चौथर्यावर जाऊन तैलाभिषेक करण्याची परवानगी दिली असली, तरी शनिशिंगणापूरच्या पंचक्रोशीतील हजारो महिला आजही चौथर्याखालून देवाचे दर्शन घेण्याची परंपरा श्रद्धेने पाळतात. याचाच आदर्श अन्यही महिलांनी घेऊन या धार्मिक प्रथा-परंपरा जपल्या पाहिजेत, असेही श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.