बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून ग्राहकांच्या वेषात विविध दागिन्यांच्या दुकानात फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 22 लाख रुपयांच्या सोनसाखळीसह, 35 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्याआहेत.
बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख संजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
सदर भामट्यांनी बेळगाव शहरातील विविध ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन ग्राहकांच्या वेशात फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील वेंगुर्ला,कोल्हापूर, सोलापूर आणि इचलकरंजी तेथेही त्यांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
या जोडगोळी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याचेही एस.पी. संजीवकुमार यांनी यावेळी सांगितले.गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नाईक, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक एम.एम.ताशिलदार नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस प्रमुख संजीवकुमार यांनी कौतुक केले आहे.