◾️कौटुंबिक कलहातून खून झाल्याचे उघड
◾️पत्नी – मुलीसह अन्य एकाला अटक
◾️कॅम्प पोलिसांची कारवाई
बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात.16 सप्टेंबर रोजी रात्री रियल इस्टेट एजंट सुधीर भगवानदास कांबळे (वय 57, रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प) यांचा घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. शनिवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती.
याप्रकरणी मयत सुधीरच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिस चौकशीत या हत्याकांडात कुटुंबियांचा सहभाग असल्याचा संशय वाढल्याने पोलिसांनी कसून तपास केला असता कौटुंबिक कलहातून मृत सुधीरची पत्नी रोहिणी सुधीर कांबळे,मुलगी स्नेहा सुधीर कांबळे आणि अक्षय महादेव विठकर रा. पुणे यांनी अत्यंत निर्दयीपणे सुधीरची हत्या केल्याचे उघड झाले.
मृत सुधीर याची पत्नी मूळची पुण्याची रहिवासी आहेत. अलीकडेच मुलगी स्नेहा देखील पुणे येथे गेली. यावेळी अक्षय विठकरशी तिची ओळख झाली. या ओळखीतून पुढे अक्षयचे कांबळे कुटुंबियांशी दृढ संबंध निर्माण झाले. हत्येच्या दोन दिवसांपूर्वी अक्षय विठकर बेळगाव येथे आला होता. मृत सुधीरची पत्नी रोहिणी व मुलगी स्नेहा यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये अक्षय ची राहण्याची सोय केली होती. यानंतर तिघांनी एकत्र येऊन सुधीर चा खून केला.
खून केल्यानंतर अक्षय बेळगावातून फरार झाला. कौटुंबिक वादातून सुधीरच्या पत्नीने मुलीसह त्याच्या हत्येचा कट रचला होता. त्यामुळे या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी मृत सुधीर कांबळे याच्या कॅम्प येथील घरातून एक चाकू जप्त केला आहे. खडेबाजार पोलिस स्थानकाचे एसीपी यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प पोलिसांनी खुनाचा तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. एम बी बोरलिंगय्या यांनी तपासात सहभागी असलेल्या सर्व पोलिसांचे कौतुक केले आहे.