No menu items!
Monday, January 12, 2026

एकादशीचे माहात्म्य

Must read

आषाढ आणि कार्तिक मासांतील एकादशींचे महत्त्व – कोणत्या तरी विशिष्ट वाराला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो, उदा. शिवाचा सोमवार, दत्ताचा गुरुवार, तशी श्रीविष्णूची एकादशी. वर्षभरात २४ वेळा येणार्‍या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

संत एकनाथ महाराज यांनी एकादशीविषयी केलेले वर्णन – ‘एकादशीचा ज्या ज्या वेळी जो-जो उत्सव केला जातो, तो-तो भगवंताला पोचतो, यात संशय धरू नये. भगवंत म्हणतो, ‘जो एकादशी व्रत करतो, त्याच्या घरी मी नित्य रहातो. एकादशी सर्व पर्वकाळात श्रेष्ठच आहे. एकादशी व्रत करणारा सर्व व्रते आणि तीर्थे यांचा राजाच आहे. तो माझ्या परिवारातीलच एक आहे. मला तो फार प्रिय आहे.’

चातुर्मासातील सर्व एकादशी तिथी आणि निरनिराळ्या जयंती यथाशास्त्र करणे योग्य आहे. शयनी, प्रबोधिनी, पवित्रा इत्यादी एकादशी, तसेच कटिनी, निराजनी, वसंतदमनका रोपणी इत्यादी जयंती यांच्या विविध पर्वकाळी नाना प्रकारच्या पूजा बांधाव्यात. आरती आणि दीपमाळा प्रज्वलित कराव्यात. टाळ आणि मृदंग वाजवून मोठा उत्सव करावा. मोठ्या उत्साहाने दिंड्या, पताका, ध्वज इत्यादी घेऊन नामाचा घोष करत पांडुरंगाच्या दर्शनयात्रेला जावे; कारण या देवाच्या यात्रेला जो जातो, तो जणू देवच आपल्या घरी आणतो आणि आपल्या आवडत्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो.’(साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय11, ओवी 1266 ते1282)

एकनाथ महाराज म्हणतात, ‘भागवताच्या अकराव्या स्कंधाच्या अकराव्या अध्यायात भगवंताची अकरा पूजास्थाने सांगितली आहेत. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, वैष्णव, आकाश, वायु, जल, पृथ्वी, स्वतःचा आत्मा आणि सर्व प्राणिमात्र अशी अकरा पूजास्थाने आहेत.’ (साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय 11, ओवी1328)

एकादशीमधील अकरा (11) या अंकाचे वर्णन – ‘अकराव्या पूजास्थानाची, म्हणजे सर्व भुतांची पूजा करावी’, असे संत एकनाथांनी म्हटले आहे. पहिला १ हा ‘पूज्य’ (भगवंत, परमात्मा) आणि दुसरा1 हा ‘पूजक (आत्मा) आहे.’ पूज्य आणि पूजक दोन्हीकडे ‘एकच (1)’ आहे, म्हणजे ऐक्य झाले.11 हा आकडा 10 इंद्रिये आणि 1 मन मिळून देहातील जाणिवेचे प्रतीक आहे. ती जाणीव सर्व प्राणिमात्रांत आहे; म्हणून त्याने सर्व भुतांची पूजा होते. जो स्वतःचे सर्व भोग भगवंताला अर्पण करण्याची भावना ठेवतो, तोच आत्मतत्त्व जाणतो. तेच सर्वत्र समत्वाने आहे.’ (साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय11, ओवी 1447 ते1449)

‘हे यदुश्रेष्ठ उद्धवा, सर्व भूतमात्रांची समत्वभावाने पूजा करणे ही माझीच पूजा आहे. त्या पूजेने माझा भक्त आवडीने मद्रूप होतो. या अकराही पूजा समत्वरूपच आहेत.’ (साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय11, ओवी1455)

दहा इंद्रिये आणि एक मन संपूर्णत पांडुरंगाला अर्पण करणे म्हणजे ‘एकादशी’. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची. या ओढीनेच तो वारकरी या ठरलेल्या वाराला पांडुरंगाकडे जाण्यासाठी निघतो; म्हणून ती ‘वारी’ आणि अशा भावनेने अन् पांडुरंगाच्या ओढीने ही वारी नियमितपणे प्रतिवर्षी करणारा तो ‘वारकरी !’

संकलक – श्री आबासाहेब सावंत ,
संपर्क – 7892400185

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!