महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. प्रत्येक स्त्रीने जागरुक व्हावे. समाजात त्यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अनिता उमदी यांनी व्यक्त केले. जायंट्स सखी आयोजित व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि महिला डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य आणि त्यांचे निराकरण यावर व्याख्यान झाले. त्याप्रसंगी डॉ. उमदी बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून आयएमएच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना महाजन, महिला डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा गिजरे, आयएमएच्या राज्य उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ उपस्थित होत्या
अध्यक्षस्थानी चंद्रा चोपडे होत्या. डॉ. उमदी म्हणाल्या, “सकस आहार, नियमित व्यायाम, योगा आणि वैद्यकीय सल्ला खूप महत्वाचा आहे. महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे, पण योग्य निदान न झाल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोगाला महिलांना तोंड द्यावे लागत आहे. धक्काधक्कीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.” रजोनिवृत्तीनंतर येणाऱ्या शारीरिक अडचणी, आहार कसा असावा? कोणता व्यायाम करावा? सांधेदुखी, गुडघेदुखी या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. यावेळी जायंट्स सखीच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या. सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी आभार मानले