कर्नाटक रक्षण वेदिकेच्या स्वाभिमानी गट आणि न्यू वंटमुरी ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली आणि तीन महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेच्या सासरच्या नागरिकांना अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन पासून घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला .त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिस आयुक्तांना आपल्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी सादर केले.
न्यू वंटमुरी गावातील गौरम्मा कोन्नूर या तीन महिन्याच्या गरोदर असलेल्या 22 वर्षीय महिलेची तिच्या सासरच्यांनी हत्या केली आहे. त्यानंतर तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत ठेवून तिने आत्महत्या केल्याचा देखावा त्यांनी निर्माण केला आहे. सदर घटनेला आठ दिवस उलटूनही याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने आज आपण इथे सर्वजण एकत्रित आलो असल्याचे पोलीस आयुक्त आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
याआधी गौरमाला तिच्या कुटुंबियांकडून मोठा त्रास देण्यात येत होता. याआधी तिने अनेक वेळा कंटाळून तिच्या माहेरी देखील गेली होती .मात्र तिला तेथून तिची समजूत काढून तिची सासरची माणसे तिला नांदून घेत असत.
आता तिचा खून करून आरोपी मोकाट भटकत आहेत .त्यामुळे आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि या घटनेत सामील असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे .अशी मागणी वंटमुरी गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.