No menu items!
Tuesday, July 1, 2025

पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिरात सापडले पोतंभर खोट्या दागिन्यांचे प्रकरण

Must read

खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवले नाही ना, याची चौकशी करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नुकतेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोते भरून खोटे दागिने सापडल्याचे मंदिरातील अधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. यामागे काही भाविक मुद्दामहून असे खोटे दागिने टाकत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यातून एकप्रकारे मंदिर प्रशासनाने स्वत:चे हात झटकले आहेत. या प्रकरणी मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे. 

  *या संदर्भातील एक निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी निवेदन स्वीकारले आणि ‘योग्य त्या कार्यवाहीसाठी हे निवेदन पुढे पाठवले जाईल’, असे आश्वासन सोलापूरचे हिंदु जनजागती समितीचे श्री. राजन बुनगे यांना दिले.*

    यापूर्वीही मंदिर प्रशासनाच्या कारभारात ‘दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे’, ‘हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे’, ‘प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे; मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे’, ‘मंदिरातील गोधन कसायांना विकणे’, ‘48 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे’, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने वर्ष 2000 ते 2010 या कालावधीत मंदिराला 47 लाख 97 हजार 716 रुपयांचा तोटा होणे आदी अनेक प्रकारचे घोटाळे हिंदु जनजागृती समितीने उघड केले आहेत. त्यामुळे पोते भरून खोटे दागिने सापडणे या प्रकरणातही काळेबेरे असू शकते.

तसेच जे वारकरी अन् वैष्णवजन शेकडो कि.मी. पायी वारी करतात. ऊन, पाणी, थंडी आदींची पर्वा न करता आपल्या लाडक्या विठूरायाला भेटायला येतात. ते विठूरायाला खोटे दागिणे अर्पण का करतील ? हा तर एकप्रकारे भोळ्या-भाबड्या वारकर्‍यांवर आरोप केल्यासारखेच आहे. या प्रकरणी नेमके काय षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. यामध्ये भाविक सराफाकडून देवासाठी दागिने तयार करून घेतात. तेव्हा सराफाकडून खोटे दागिने दिले जात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचाही सरकारने शोध घ्यायला हवा. असे पुन्हा कोणाला करता येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने दागिने अर्पण करताना ते खरे आहेत कि खोटे आहेत, हे लगेच पडताळण्याची व्यवस्था करायला हवी. अशी व्यवस्था करणे, मंदिर प्रशासनासाठी सहज आहे; मात्र अशी व्यवस्था अद्यापपर्यंत का निर्माण करण्यात आली नाही, यातून मंदिर प्रशासनाला देवनिधीची किती काळजी आहे, हेच दर्शवते. हे सर्व मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिर सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी समितीने केली आहे.

आपला नम्र,
श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती. (संपर्क : 70203 83264)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!