अलीकडेच कर्नाटक सरकारने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. पण बऱ्याच शाळा व महाविद्यालयात शिवजयंती साजरी केली जात नाही तर काही ठिकाणी मराठी विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास पुढे आले तर शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांची अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. म्हणून म. ए. युवा समिती च्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करावी या संदर्भात सूचना सर्व शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापकाना द्याव्यात अशा मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आले.
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षणाधिकारी सुजाता बाळेकुंद्री यांनी सदर निवेदन स्वीकारून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले जातील अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली.
यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष श्री अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा नेते शुभम शेळके, सुरज कुडुचकर, सचिन केळवेकर, किरण मोदगेकर, वासू सामजी, आनंद पाटील, विनायक कावळे, प्रवीण रेडेकर आणि मनोहर संताजी आदी उपस्थित होते.