उत्तर प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया इंटर साई राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगावचा उदयोन्मुख होतकरू मल्ल पै. ओम घाडी याने 48 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे.
खेलो इंडिया इंटर साई राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पहिल्या कुस्तीत पै. ओम घाडी याने प्रतिस्पर्धी पंजाबच्या पै. अमरसिंग याच्यावर ०८-०२ आणि उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशच्या हिमांशूवर १०-०३ अशा गुणांनी विजय मिळविला. त्यानंतर उपांत्य फेरीत पै. ओम घाडी याने प्रतिस्पर्धी महाराष्ट्रच्या करिशवर ९-७ गुणांनी विजय संपादन करून अंतिम फेरी गाठली. दुर्दैवाने अंतिम फेरीत त्याला कर्नाटकाच्या पै. विकास याच्याकडून पराभव पत्करून रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पै. ओम घाडी हा धारवाडच्या ऑल इंडिया साई सेंटरमध्ये कुस्तीचा सराव करत आहे. त्याला एनआयएस कुस्ती प्रशिक्षक राम बुडकी व भांदूर गल्ली तालमीचे वस्ताद पै. मारुती घाडी सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. खेलो इंडिया इंटर साई राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल पै.ओम घाडी याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.