No menu items!
Thursday, August 28, 2025

शिवसन्मान पदयात्रेला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील व समिती नेते आर. आय. पाटील यांचा पदयात्रेत सहभाग

Must read

बेळगाव : शिवाजी महाराजांसह भगव्या ध्वजाचा सन्मान राखण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवसन्मान पदयात्रेचे आज गुरुवारी सकाळी सुळगा गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

छ. शिवाजी महाराजांसह भगव्या ध्वजाचा सन्मान तसेच मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती अबाधित राखण्यासह मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद दाखविण्यासाठी आयोजित शिवसन्मान पदयात्रेला मंगळवारी राजहंसगडावरून सुरुवात झाली आहे. काल विविध गावात फिरून जनजागृती केल्यानंतर आज गुरुवारी सकाळी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली येळ्ळूर येथून सुरू झालेल्या या पदयात्रेचे सर्वप्रथम सुळगा गावात आगमन झाले. यावेळी पंचमंडळींसह समस्त गावकऱ्यांनी शिवसन्मान पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करून पदयात्रेला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. गावातील प्रत्येक गल्लीमध्ये सुहासिनींनी पदयात्रेचे नेतृत्व करणाऱ्या भगव्याचे पूजन व औक्षण केले. सुळगा गावात शिवसन्मान पदयात्रेचे स्वागत करण्याबरोबरच माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील व समिती नेते आर. आय. पाटील हे दोघेही पदयात्रेत सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या की, ही पदयात्रा म्हणजे शिवछत्रपतींच्या सन्मानार्थ रमाकांत दादा कोंडुसकर यांनी उचललेले मोठे पाऊल आहे. सदर पदयात्रेला सर्वत्र मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही अभिमानाची बाब आहे. रमाकांत दादा यांनी आता फक्त एक पाऊल उचललं तर राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून गेली साडेचार वर्षे झोपेचे सोंग घेतलेले आमदार मतांसाठी आता जागे झाले आहेत. बेंगलोर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची शाई फेकून विटंबना करण्यात आली, त्यावेळी यापैकी एकाही राजकीय नेत्याने आवाज उठविला नाही. त्यावेळी फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाज उठविला होता. या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातूनच रमाकांत दादांनी उचललेले हे पाऊल आदर्शवत आहे. छ. शिवाजी महाराजांनी मराठी माणूस, मराठी भाषा, संस्कृती आणि समस्त हिंदूंसाठी 18 पगड जातीच्या लोकांसाठी स्वराज्याची स्थापना केली. मात्र दुर्दैवाने आज शिवरायांचा आदर्श घेण्याऐवजी राजकीय पक्षांचा विचार केला जातो. महाराष्ट्र एकीकरण समिती याला अपवाद असून आम्ही समितीच्या झेंड्याखाली छत्रपतींचा सन्मान अभिमान कायम राखण्यासाठी निरंतर कार्यरत राहणार आहोत. ही पदयात्रा म्हणजे त्याची सुरुवात आहे असे सांगून मराठी माणूसच नव्हे तर समस्त हिंदूंनी शिवरायांच्या सर्व मावळ्यांनी या पदयात्रेत सामील व्हावे, असे आवाहन सरस्वती पाटील यांनी केले.

शिवसन्मान पदयात्रा गावातील सर्व गल्ल्यांमधून फिरल्यानंतर सुळगे गावकऱ्यातर्फे पदयात्रेत सहभागी नेते आणि कार्यकर्त्यांसाठी खास न्याहरीची व्यवस्था केली होती. याबद्दल रमाकांत कोंडुसकर यांनी सुळगावासियांचे आभार मानले. सुळगा गावात जनजागृती केल्यानंतर शिवसन्मान पदयात्रा पुढील गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली. सदर पदयात्रेद्वारे देसूर, झाडशहापूर, मच्छे, हुंचेनहट्टी, बाळगमट्टी व कुट्टलवाडी गावात जनजागृती केली. त्यानंतर सायंकाळी पिरनवाडी येथे पदयात्रेची सांगता होऊन ग्रामवास्तव्य केले जाणार आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!