तब्बल 66 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेली भारतातील जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी शहरातील मराठा युवक संघाची प्रतिष्ठेच्या ‘बेळगाव श्री’ किताबाची जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे यंदा ‘बेळगाव हर्क्युलस’ ही स्पर्धा देखील घेतली जाणार आहे.
मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ) मुंबई यांच्या मान्यतेने आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन (बीडीबीबीए) यांच्या सहकार्याने ‘बेळगाव श्री -2023’ स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून या आयोजना संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. बाळासाहेब काकतकर यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करून स्पर्धेचे स्वरूप सांगितले. चंद्रकांत गुंडकल यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत यंदाच्या वर्षी ‘बेळगाव हर्क्युलस’ या स्पर्धेचे आयोजनही करण्याचे ठरले. या स्पर्धेमध्ये फक्त माजी बेळगाव श्री किताब विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना भाग घेता येईल. सदर स्पर्धा टॉप टेन या प्रकारात घेण्यात येणार आहे.
बैठकीमध्ये आयबीबीएफचे स्पर्धा संयोजक सचिव अजित सिद्दण्णावर यांनी बेळगाव श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे नियम आणि जबाबदारी याबाबत माहिती करून दिली. बैठकीस बाळासाहेब काकतकर यांच्यासह मराठा युवक संघाचे उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, विश्वास पवार, शेखर हंडे, श्रीकांत देसाई, नागेश तरळे, नारायण किटवाडकर आदींसह बीडीबीबीएचे एम. के. गुरव व इतर उपस्थित होते. बेळगाव श्री किताबाच्या स्पर्धेसाठी एस. एस. फाउंडेशनचे संजय सुंठकर यांनी 25 हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे.