महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनाप्रसंगी महाराष्ट्रातील माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते कांही पुस्तके येळ्ळूर ग्रामपंचायत ग्रंथालयाला भेटी दाखल मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या 12 डिसेंबर 2022 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतीला व ग्रा. पं. ग्रंथालयाला भेट दिली होती. त्यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी ग्रंथालयासाठी विविध पुस्तकांची मागणी केली होती. त्या मागणीची पूर्तता आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथील आझाद मैदानमध्ये नुकत्याच झालेल्या सीमाप्रश्ना संदर्भातील धरणे आंदोलनावेळी केली. व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार व आमदार अतुल बेनके तसेच माजी आमदार मनोहर किणयेकर यांच्या हस्ते येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, जोतीबा चौगुले, परशराम परीट व तानाजी पाटील यांच्याकडे पुस्तके सुपूर्द केली गेली. आश्वासनानुसार ग्रामपंचायतीला पुस्तके दिल्याबद्दल येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.