No menu items!
Friday, November 22, 2024

‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो गड-दुर्ग प्रेमींच्या मागण्यांना यश !

Must read

गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार ! – मा. श्री. मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण करण्यासाठी आणि त्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना येत्या तीन महिन्यांत करण्यात येईल. ठराविक कालमर्यादा ठरवून सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील, तसेच उर्वरित सर्व मागण्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व दुर्गप्रेमी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ठोस आश्वासने राज्याचे पर्यटन, महिला आणि बालविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’च्या सांगतेच्या वेळी दिली, अशी माहिती ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली. ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मा. मंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ आयोजित ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्या’त राज्यभरातून गड-दुर्गप्रेमी संघटनांचे 1500 हून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते. मुखात छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवे झेंडे अन् मागण्यांचे फलक; यांसह तुतारी अणि मावळ्यांची वेशभूषा करत दुर्गप्रेमी उत्साहात या महामोर्च्यात सहभागी झाले होते आणि गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला पोटतिडकीने आर्त साद घातली. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान काढण्यात आलेल्या मोर्च्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराज यांची दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील आणि सरनोबत अंतोजीराजे गाडे पाटील यांचे वंशज श्री. अमित गाडे, वीर कोयाजी बांदल यांचे वंशज श्री. अक्षय बांदल, मोरोपंत पिंगळे यांचे वंशज श्री. विश्वजित देशपांडे, श्री. कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड, वीर शिवा काशिद यांचे वंशज श्री. आनंदराव काशिद, श्री पंताजीकाका बोकील यांचे वंशज गौरव बोकील या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचा सहभाग लक्षवेधी होता.

यांसह ‘समस्त हिंदु बांधव संघटने’चे श्री. रविंद्र पडवळ, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, वसई येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गव श्री बी.पी. सचिनवाला, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या ‘धर्मसभा-विद्वत्संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, ‘सनातन संस्थे’च्या धर्मप्रसारक संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर या मोर्च्यात उपस्थित होते. यांसह मोर्च्यामध्ये समस्त हिंदू बांधव संघटना, शिवराज्याभिषेक समिती, मराठा वॉरीयर्स, गड-दुर्ग संवर्धक संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, श्री शंभूदुर्ग प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी (महिला शाखा), युवा मराठा महासंघ, शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, स्वतंत्र सवर्ण सेना, हिंदु धर्मजागरण, सनातन संस्था, अखिल भारतीय मराठा सेवा महासंघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी 100 हून अधिक गड-दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी समस्त हिंदू बांधव संघटनेचे श्री. पडवळ यांनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी महामंडळ स्थापन करणे का आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या वंशजांनीही या वेळी आपले विचार मांडले. मोर्चामागील ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ची भूमिका स्पष्ट करतांना श्री. सुनील घनवट म्हणाले की, विशाळगडावर 100 हून अधिक अनधिकृत आर्सीसी बांधकामे झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले. अशाच प्रकारे रायगड, लोहगड, कुलाबा, वंदनगड, दुर्गाडी किल्ला यांसह राज्यातील महत्त्वाच्या 35 महत्त्वाच्या गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य विविध प्रकारची अतिक्रमणे झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांवरील ही अतिक्रमणे शिवप्रेमींच्या श्रद्धांवर आघात करणारी तर आहेतच, तसेच प्रचंड चीड आणणारीही आहेत. याला पुरातत्व विभागाचे जे अधिकारी उत्तरदायी असतील, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करावी.

अनेक गड-दुर्गांच्या ठिकाणी होणारे मद्यपान, विद्रूपीकरण, अस्वच्छता आदी अपप्रकार थांबवावेत, तसेच अनेक गड-दुर्गांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड, ढासळलेले बुरूज, तोफांची दुरावस्था थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालावे. शासनाने गड-दुर्ग संवर्धनासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच गडांची नियमित स्वच्छता आणि पावित्र्यरक्षण यांसाठी शासनाने गड-दुर्गप्रेमी संघटनांचे साहाय्य घ्यावे. पुरातत्त्व खात्याने सर्व गड-दुर्गांची योग्य माहिती आणि कायदेशीर बाबी सांगणारे संकेतस्थळ चालू करावे. त्यात नागरिकांना तक्रार करण्याची सोय असावी. गड-दुर्ग रक्षणासाठी स्थापन करण्यात येणार्‍या महामंडळात गड-दुर्ग संवर्धनासाठी कार्य करणारे प्रतिनिधी, मावळ्यांचे वंशज, गड परिसरातील दुर्गप्रेमी-शिवप्रेमी यांना सहभागी करावे, आदी विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. मोर्चाच्या सांगतेवेळी छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आरंभलेला हा लढा गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन होईपर्यंत पुढेही चालूच राहील, असेही श्री. घनवट म्हणाले.

आपला नम्र,

श्री. सुनील घनवट,
समन्वयक, ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’, तथा महाराष्ट्र संघटक, ‘हिंदु जनजागृती समिती’,
संपर्क : 7020383264

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!