मणिपूरचा क्षेत्रीमयूम निरज सिंग ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे आयोजित 13 व्या ‘कनिष्ठ मि. इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा किताब मणिपूरच्या क्षेत्रीमयूम निरज सिंग याने पटकाविला. विशेष म्हणजे या स्पर्धेत बेळगावचा आकाश निंगराणी 55 किलो वजनी गटात ज्युनिअर मिस्टर इंडिया ठरला, तर प्रताप कालकुंद्रीकर याने मास्टर्स विभागात रौप्य पदक पटकावले.
मध्य प्रदेशातील रतलाम येथे गेल्या दोन दिवसात म्हणजे 4 व 5 मार्च 2023 रोजी सदर 13 वी ज्युनियर / मास्टर्स /दिव्यांग मि. इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचे सांघिक जेतेपद 145 गुणांसह महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटुंनी पटकावले. महाराष्ट्र मागोमाग मणिपुर (140 गुण) आणि कर्नाटक (130 गुण) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. या राष्ट्रीय पातळीवरील ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत कर्नाटकातील शरीर सौष्ठवपटूंचा देखील सहभाग होता.
ज्युनिअर मिस्टर इंडिया किताबाच्या स्पर्धेतील मास्टर्स विभाग अर्थात 40 ते 50 वर्षे वयाच्या शरीरसौष्ठवपटूंसाठी असलेल्या 80 किलो वजनी गटात बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर याने द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक मिळविले. त्याचप्रमाणे याच वयोगटातील मात्र 80 किलो वरील वजनी गटात कर्नाटकचा नित्यानंद कोटियन प्रथम आला. 50 ते 60 वर्षे वयोगटात कर्नाटकच्या श्रवणन हरिराम आणि साहेबलाल छप्परबंद यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. स्पर्धेच्या 55 किलो या कनिष्ठ गटाचे विजेता ज्युनिअर मि. इंडिया बेळगाव कर्नाटकचा आकाश निंगराणी हा ठरला. त्याचप्रमाणे 60 किलो वजनी गटाचा विजेता कर्नाटकचा निर्मलकुमार शेट्टर हा ठरला. तसेच 75 किलो वजनी गटात कर्नाटकच्या गिरीश मॅगेरी याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पद्धतीने बेळगावसह कर्नाटकच्या शरीरसौष्ठवपटूंनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उत्तम कामगिरी नोंदवत आपली पात्रता सिद्ध केली. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते टी. व्ही. पॉली, सरचिटणीस श्रीमती हिरल सेठ, खजिनदार अतीन तिवारी, फेडरेशनचे स्पर्धा संयोजक सचिव बेळगावचे आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दणावर यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.