शहर स्वच्छ रहावे यासाठी कष्ट घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी महापालिकेत आवाज उठवून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन नगरसेवक रवी साळुंखे यांनी केले.
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे बुधवारी खासबाग येथील समुदाय भवन येथे महिला दिनानिमित्त महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक रवी साळुंखे होते. प्रमुख पाहुण्या माजी उप महापौर रेणू किल्लेकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी कष्ट घेऊन महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. त्यामुळे महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. सावित्रीबाई यांना त्रास सहन करावा लागला मात्र त्यामागे हटल्या नाहीत. त्याच प्रमाणे महिलांनी आपले ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाणे गरजेचे आहे. स्वच्छता कर्मचारी पहाटे पाच वाजल्या पासून घराबाहेर पडतात आणि अतिशय कष्टाने शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्वच्छता कर्मचारी अनेकदा आपल्या आरोग्याचा विचार करीत नाहीत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो त्याची दखल घेत महिलांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेने अधिक सुविधा देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
खानापूर संघटनेचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांनी संघटनेतर्फे दरवर्षी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. येणाऱ्या काळात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाणार असून संघटनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती दिली.
माजी नगरसेवक नेताजी जाधव मनोहर हलगेकर, राजु बिर्जे, संघटनेचे माजी अध्यक्ष पी जे घाडी, सुहास शहापूरकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक कलावती आडीमणी यांनीही मनोगत व्यक्त केले.
संघटनेचे सचिव सुरेश कल्लेकर यांनी प्रास्तविक तर मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव कोळेकर यांनी आभार मानले. भारत नांदवडेकर, यल्लाप्पा कोलकार, प्रतीक गुरव यांच्या सह नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
आवाज उठवून मदत मिळवा:नगरसेवक रवी साळुंखे
