वादळी वारा आणि पावसामुळे उन्मळून पडलेल्या मोठ्या झाडाखाली सापडून चार दुचाकींचे सुमारे दीड -दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना कणबर्गी येथे गेल्या रविवारी सायंकाळी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गेल्या रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कणबर्गी गावातील कांही युवक नेहमीप्रमाणे दुपारनंतर पाटील गल्लीतील एसएसआरडी हायस्कूल मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. तत्पूर्वी त्यांनी आपल्या दुचाकी मैदाना शेजारी असलेल्या झाडांखाली पार्क केल्या होत्या. तेंव्हा सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे मैदाना शेजारील एक मोठे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. हे झाड नेमके खाली पार्क केलेल्या चार दुचाकींवर पडल्यामुळे झाडाचा बुंधा आणि फांद्याखाली सापडून या दुचाकींची बरीच मोडतोड झाली. सुदैवाने झाड कोसळले त्यावेळी झाडाच्या आसपास मनुष्यवर्दळ नव्हती त्यामुळे अनर्थ टळला. मात्र झाड कोसळण्याच्या या घटनेत एका रॉयल एनफिल्डसह होंडा मोटरसायकल, स्प्लेंडर मोटरसायकल आणि ॲक्टीव्हा अशा चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.