खडेबाजार शहापूर येथे सराफ गल्ली कॉर्नर वर रस्त्याच्या मधोमध खोदण्यात आलेला खड्डा सध्या या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी मनस्ताप देणारा ठरत आहे. खडेबाजार शहापूर येथे सराफ गल्ली कॉर्नरवर रस्त्याच्या मधोमध कांही कामासाठी खड्डा खणण्यात आला आहे. सदर खड्डा ज्या कारणासाठी खोदण्यात आला आहे ते काम तात्काळ पूर्ण करून हा मुख्य रहदारीचा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावयास हवा होता.
मात्र संबंधित काम वेळच्यावेळी करण्याऐवजी सध्या या खड्ड्याच्या सभोवती बॅरिकेड्स घालून आपण किती काळजीवाहू आहोत हे संबंधित खात्याकडून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराचा त्रास मात्र या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विशेष करून दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांना होत आहे. तरी महापौरांसह या भागाचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा आणि सभोवतीच्या बॅरिकेड्सचा अडथळा लवकरात लवकर दूर करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.