हलियाळ माजी आमदार श्रीकांत घोटणेकर आणि उद्योगपती प्रसन्ना घोडके यांनी आज सकाळी शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आश्रमाच्या सेवाभावी कार्यासाठी माजी आमदार घोटणेकर यांनी आपल्या संस्थेच्यावतीने 56 हजार रुपयांची देणगी देऊ केली.
माजी आमदार श्रीकांत घोटणेकर यांनी आज शुक्रवारी सकाळी शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी शांताई वृद्धाश्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा करण्याबरोबरच त्यांनी आश्रमामधील सर्व आजा-आजींची विचारपूस करून त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. तसेच आश्रमातील सर्व सेवेकरी मंडळींचे कौतुक करूनआश्रमाचा कार्यासाठी आपल्या संस्थेच्यावतीने 56000 ची देणगी देऊन सहकार्य केले. बेळगाव शहराला ज्या ज्या वेळेला मी येईन त्यावेळेला मी शांताई वृद्धाश्रमाला भेट देईन आणि आपल्यापरिने सढळ हस्ते मदत करेन, असे आश्वासनही माजी आमदार श्रीकांत घोटणेकर यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत उद्योगपती प्रसन्ना घोडके त्यांचे मित्र व चिरंजीव उपस्थित होते.
शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे आणि संचालक ॲलन मोरे यांच्याकडे माजी आमदार घोटणेकर यांनी देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बोलताना कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून श्रीकांत घोटणकर साहेब बेळगावला येतील त्यावेळेला आमच्या सामाजिक कामासाठी सहकार्य करत असतात. स्वतःच्या मतदार संघातील रुग्ण सेवेसाठी वेळोवेळी माझ्या संपर्कात असतात असे सांगितले. त्याचप्रमाणे शांताई वृद्धाश्रमाला भरीव देणगी दिल्याबद्दल कार्याध्यक्ष या नात्याने मोरे यांनी सर्व संचालक मंडळाच्यावतीने आणि वृद्धांच्यावतीने श्रीकांत घोटणेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्याचबरोबर प्रसन्ना घोडके कित्येक वर्षापासून शांताई वृद्धाश्रमाच्या संपर्कात आहेत. ते देखील वेळोवेळी वृद्धाश्रमांना मदत करत असतात. दरवर्षी आपला वाढदिवस शांताई वृद्धाश्रम आणि बेळगाव शहरांमधील वेगवेगळ्या आश्रमांमध्ये साजरा करून समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम प्रसन्न घोडके करत आहेत. त्यांचाही मी मनापासून आभारी आहे, असे विजय मोरे शेवटी म्हणाले.