दरवर्षीप्रमाणे मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे यंदा देखील दिवाळीनिमित्त गरजू अनाथांना दिवाळीच्या फराळाचे व कपड्यांचे वाटप करण्याचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
गरीब, अनाथ, उपेक्षित व कष्टकऱ्यांच्या घरीही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा. विद्यार्थ्यांना समाजातील तळागाळातील लोकांची ओळख व्हावी. त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे समाजभान सतत जागृत राहावे, यासाठी मराठी विद्यानिकेतन शाळा दरवर्षी दिवाळीमध्ये गरीब गरजू अनाथांसाठी फराळ व कपड्यांचे वाटप उपक्रम राबवत असते. यावर्षीही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील फराळ व चांगल्या प्रकारचे कपडे शाळेत जमा करून हे कपडे व फराळ ज्योतीनगर गणेशपुर येथील गरीब विद्यार्थी व इव्हान लोमॅक्स यांच्या होम फॉर होमलेस अनाथालयातील वृद्धांना भेट दिले.
या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्योतीनगरच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद ही घेतला. तसेच अनाथालयातील वृद्धांसोबत आनंदाने वेळ घालविला. याप्रसंगी ज्योतीनगर शाळेतील मुख्याध्यापक मासेकर, शिंदोळकर मॅडम, मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षक शितल बडमंजी, मंजुषा पाटील, अश्विनी हलगेकर, सुनीता पाटील, माजी विद्यार्थी सुरज हत्तलगे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रसाद सावंत यांनी उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाबद्दल ज्योतीनगर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी तसेच इव्हॉन लोमेक्स आश्रमातील गरजू व अनाथांनी समाधान व्यक्त केले.