राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि. ९ रोजी भरविण्यात येणार आहे. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार यांच्यावतीने लोकअदालतीची तयारी करण्यात आली आहे. तीन महिन्यांतून एकदा ही लोकअदालत भरविण्यात येते. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने खटले निकालात काढले जातात. शनिवारी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये ५ हजारांहून अधिक खटले निकालासाठी घेण्यात आले आहेत. त्यामधील जास्तीतजास्त खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा सेवा कायदा प्राधिकारचे सचिव आणि न्यायाधीश मुरलीमनोहर रेड्डी यांनी सांगितले. लोकअदालतीमुळे प्रलंबित खटल्यांची संख्या कमी → होत चालली आहे. सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा दिलासा मिळत आहे. चेकबॉन्स, बँक कर्ज भरणा, सोसायटीचे कर्ज भरणे, फौजदारी, विमा नुकसानभरपाई, कौटुंबिक आणि दिवाणी खटले निकालात काढले जात आहेत. त्यामुळे पक्षकारांना दिलासा मिळत आहे. शनिवारी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये जास्तीतजास्त खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. खटल्यातील वादी व प्रतिवादींना समोरासमोर बसवून हे खटले निकालात काढले जातात. यासाठी न्यायाधीशदेखील पक्षकारांना समजावून सांगतात. वकिलांच्या सहकार्यातून हे खटले निकालात काढले जात आहेत. कोणावरही अन्याय होऊ नये, दोघांच्याही सहमतीने खटले निकालात काढले जात आहेत. प्रत्येक लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.