कागवाड /
आपल्या दैनंदिन जीवनात पोषण खूप मोठी भूमिका बजावते. अन्न किंवा द्रव आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम करतात कारण प्रत्येक अन्न किंवा द्रवामध्ये विशिष्ट पोषण असते जे आपल्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. कोणत्याही विशिष्ट पोषणाची विशिष्ट पातळी आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला माहित असले पाहिजे की आपण कोणते अन्न घ्यावे, किती आणि कोणत्या प्रकारचे पोषण हे विशिष्ट अन्न आहे. पुरेसे पोषण हे वाढ आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे सर्वात महत्त्वाचे घटक आहे. संतुलित आहारामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि फायबर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. आजच्या जंक फूड च्या जमान्यात पोषक आहाराचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे प्रतिपादन डॉ. सौम्या पाटील यांनी केले.
कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयात एनसीसी युनिटच्या वतीने न्यूट्रि फेस्ट चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. सौम्य पाटील बोलत होत्या. प्राचार्य डॉ. एस. ए. कर्की यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. गविष रामदुर्ग, उपप्रचार्या डॉ. डी. डी. नगरकर, आयक्युएसी अधिकारी प्रा. बी. डी. दामन्नावर, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आलगोंडी उपस्थित होते.
फळ हंडीची फित सोडून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्राध्यापक जे के पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी डॉ गविष रामदुर्ग यांनी पोषक आहारापासून मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. ए. कर्की यांनी योग्य आहाराची सवय लावून घेतल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. यासोबत दैनंदिन कामकाजात नवचैतन्य प्राप्त होते असे सांगितले.
एनसीसी विभागाच्या वतीने न्यूट्रि फेस्टिव्हलच्या निमित्ताने रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. तसेच पोषक आहाराचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या आणि मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी डॉ. एस.पी. तळवार, डॉ. अमोल पाटील, प्रोफेसर फडतरे आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट सानिया मोमीन आणि श्वेता बाबर यांनी केले तर आभार लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांनी मानले