विलक्षण कौशल्य आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन घडवताना मजगाव, बेळगावच्या श्रीधर माळगी याने 3 सुवर्णपदकांसह एकूण 10 पदके हस्तगत करत थायलंड येथे नुकतीच पार पडलेली वर्ल्ड ॲडबिलिटी स्पोर्ट्स गेम्स -2023 ही जागतिक स्पर्धा गाजवली आहे.
थायलंड येथे गेल्या 4 ते 8 डिसेंबर या कालावधीत आयोजित वर्ल्ड ॲडबिलिटी स्पोर्ट्स गेम्स-2023 मधील जलतरण विभागात बेळगावचा होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगी याने 3 सुवर्ण पदकं, 6 रौप्य पदकं आणि 1 कांस्य पदक पटकावले. विविध जलतरण प्रकारात श्रीधरने मिळविलेले यश पुढील प्रमाणे आहे. 50 मी. बॅकस्ट्रोक सुवर्ण पदक, 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक सुवर्ण, 100 मी. फ्रीस्टाइल रौप्य पदक, 50 मी. बटरफ्लाय रौप्य, 100 मी. बॅकस्ट्रोक रौप्य, 100 मी. बटरफ्लाय रौप्य, 400 मी. फ्री स्टाईल रौप्य, 200 मी. वैयक्तिक मिडले रौप्य, आणि 50 मी. फ्रीस्टाइल कांस्य पदक. सदर कामगिरीमुळे श्रीधर माळगी याने जागतिक स्तरावर बेळगावसह देशाचा नावलौकिक वाढविला आहे.
थायलंडच्या जागतिक स्पर्धेतील आपल्या यशाद्वारे श्रीधर
फक्त जगातील मातब्बर खेळाडूंच्या पंगतीत जाऊन बसला नाही तर विलक्षण प्रतिभांचे पालनपोषण संवर्धन करणारे शहर हा बेळगावचा नावलौकिक त्याने अधिक मजबूत केला आहे. बालपणी अपघाताने डावा हात गमावलेल्या श्रीधरने आपल्या अप्रतिम जलतरण कौशल्याच्या जोरावर आजपर्यंत 19 आंतरराष्ट्रीय आणि 41 राष्ट्रीय पदके आपल्या नावावर केली आहेत. ज्यामध्ये 36 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. जलतरणातील बटरफ्लाय स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक आणि फ्रीस्टाइल या प्रकारामध्ये श्रीधरचा हातखंडा आहे. श्रीधर हा सध्या बेंगलोर येथील झी स्विमिंग अकॅडमी आणि बेळगावातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव या ठिकाणी जलतरणाचे प्रशिक्षण घेत सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी 3 तास सराव करतो. त्याला त्याचे गुरु जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी आणि अर्जुन पुरस्कार विजेते ऑलंपियन शरथ एम. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. श्रीधरला गो स्पोर्ट्स फाऊंडेशनचा देखील मोठा पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे त्याला आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, एसएलके ग्रुप बेंगलोर, अलाईड फाउंड्रीज बेळगाव, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे. जागतिक स्पर्धेतील उपरोक्त यशाबद्दल श्रीधर माळगी याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.