‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज केले.
महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत श्री सिंग यांनी येथे मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात, दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तसेच प्रधान सचिव श्री रुपिंदर सिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री सिंग यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दिवाळी हा सर्वसामान्य भारतीयांचा प्रमुख सण म्हणून देशभर साजरा केला जातो. महाराष्ट्रात दिवाळी निमित्त निघणा-या दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे आता या सणाला बौध्द्कितेची जोड म्हणजे दिवाळी अंक. महाराष्ट्रात आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथूनही विशेषांक प्रकाशित केले जातात.
महाराष्ट्रात 1909 पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषकांची पंरपरा आज 115 वर्षापर्यंत पोहोचली. दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणून आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच विषयांवर दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही निवासी आयुक्त श्री सिंग यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन ही येथील वाचकांसाठी वाचन महोत्सव असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री सिंग यांनी यावेळी केले.
प्रदर्शनात 120 दिवाळी अंकांची मेजवानी
या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज, मिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ, झी मराठी आदि 130 दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आज पासून सुरू झाले असून, शुक्रवारी 22 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार व सकाळी 10 वाजता पासून ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
यावर्षीच्या दिवाळी विशेषांकामध्ये ‘धनंजय, जत्रा, साधना, सामना, आवाज, अक्षरधारा, किशोर, प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, अंतर्नाद’ असे एकापेक्षा एक सरस अंक आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ग्रंथालयातील वाचक सदस्यांसाठी दिवाळी अंक उपलब्ध राहतील.