नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेले शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी शहरातील उज्वलनगर आणि अमननगर भागातील विकास कामांचा पाहणी दौरा करण्याबरोबरच जनता दरबार घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
उज्वलनगर आणि अमननगर भागातील आपल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार असिफ सेठ यांनी तेथे सुरू असलेल्या गटार बांधकामासह इतर विकास कामांची पाहणी केली. याखेरीज जनता दरबाराचे आयोजन करून दोन्ही नगरातील स्थानिक रहिवाशांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या. तसेच त्यांचे निवारण करण्याचे आश्वासनही दिले. उज्वलनगर हे अलीकडेच विकसित होत असल्यामुळे येथील कांही भागात चांगल्या रस्त्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे अमननगर हा भाग अलीकडे कांही वर्षात वृद्धिंगत झाला आहे. या भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी व्यवस्थित पाईपलाईन नव्हती. आमदारांच्या दौऱ्याप्रसंगी सदर पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पाहणी दौऱ्याप्रसंगी बोलताना आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आता नववर्षाला प्रारंभ झाला असून जनसेवेसाठी दृढनिश्चय आणि वचनबद्धतेने शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करणे याला मी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. या भागात पायाभूत सुविधांचा अभाव असून सर्वांना या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन, असे सांगितले आमदारांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित अधिकारीवर्ग उपस्थित होता.