उन्हाळा सुरू झाला किंवा परीक्षा संपल्या की सगळीकडे बालकांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते पण जेष्ठांसाठी शिबिराचे आयोजन होताना दिसत नाही म्हणूनच गेल्यावर्षीपासून संजीवीनी फौंडेशनमध्ये जेष्ठांसाठी उन्हाळी शिबिर भरवण्यात येत आहे.
गुरुवार दि ४मार्च रोजी याची सुरुवात आदर्शनगर येथे करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उदघाटक म्हणून ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे चेअरमन ऍड चंद्रहास अणवेकर, प्रमुख पाहुण्या म्हणून जी जी चिटणीस स्कुलच्या मुख्याध्यापिका डॉ नविना शेट्टीगार, सीईओ मदन बामणे,संस्थेच्या संस्थापिका डॉ सविता देगीनाळ डॉ सुरेखा पोटे संचालिका रेखा बामणे उपस्थित होत्या.
मान्यवरांचे स्वागत जयश्री ढवळी यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ देगीनाळ म्हणाल्या की दररोज वेगवेगळ्या पद्धतीने चित्रकला, पैंटिंग, नृत्यकला, तसेच वेगवेगळे खेळ आयोजित करून त्यातून उत्कृष्ट कला सादरीकरण करणाऱ्याना बक्षिसे दिली जातात तसेच एक दिवस सहलीचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात प्रत्येकजण सहभागी होऊन आनंद लुटत असतात.
सर्वप्रथम उदघाटक ऍड चंद्रहास अणवेकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
ऍड अणवेकर यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना अणवेकर म्हणाले की आजपर्यंत लहान मुलांसाठी समर कॅम्प असतात हे पाहिलं होतं पण पहिल्यांदाच जेष्ठांसाठी पण अशा पद्धतीचे कॅम्प आयोजित केल्याचे पाहिले. संजीवीनी फौंडेशनने खूप स्तुत्य उपक्रम असून राबवला असून याचा आनंद सहभागी व्यक्तींनी घ्यावा असेही सांगितले.
यावेळी नविना शेट्टीगार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी पुढील वर्षांपासून हे उन्हाळी शिबिर फक्त फौंडेशनपुरते मर्यादित न ठेवता बाहेरील जेष्ठ नागरिकांसाठी सुध्दा आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
पहिल्या दिवशी मटके रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत चोवीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवीनी फौंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सिद्दी यांनी तर आभार विजयालक्ष्मी पाटील यांनी केले
संजीवीनीमध्ये जेष्ठांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन
