कल्लेहोळ (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शिक्षक व्ही पी पाटील यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
शाळेचे मुख्याध्यापक बी. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एसडीएमसी अध्यक्ष भैरवनाथ अप्पाजी चौगुले, उपाध्यक्षा पूजा पुंडलिक कित्तूर, मारुती बाळेकुंद्री आणि सेवानिवृत्त कॅप्टन मनोहर कित्तूर उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पूजा कित्तूर यांनी श्री सरस्वती पूजन केले, तर मारुती बाळेकुंद्री यांनी श्रीफळ वाढविले. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक पाटील यांनी केले. शाळेचा सन 2023 -24 या वर्षाचा अहवाल शिक्षक एम. आर. गाडेकर यांनी सादर केला.
सदर कार्यक्रमात शाळेतील सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना निरोप देण्याबरोबरच सेवानिवृत्त शिक्षक व्ही. पी. पाटील सर यांचा एसडीएमसीसह शाळेच्यावतीने शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. एम एच पी एस आंबेवाडी चे मुख्याध्यापक एस. व्ही. बेन्नाळकर, माजी विद्यार्थी संघटना कल्लेहोळ, रतन मुतकेकर इत्यादींनी हा सत्कार केला. तसेच 2023 -24 सालातील ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून लखन देवाप्पा चौगुले आणि ‘आदर्श विद्यार्थिनी’ म्हणून प्राची दत्तप्रसाद कित्तूर यांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने रसिका विनोद वेताळ हिने निरोपपर मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शाळेच्या वतीने श्रीमती ए. एस. सरदेसाई यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले.