वनविभाग व वन्यजीव परिसर विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. वनविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक अधिकारी विजयकुमार सालिमठ उपस्थित होते.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ, उपवन संरक्षण अधिकारी जी पी. हर्षभानू सामाजिक वनीकरण विभागाचे शिवानंद नाईकवाडी, शंकर कल्लोळकर, वन्यजीव परिसर विकास संघाचे अध्यक्ष सुरेश दुर्बिनट्टी सचिव डॉ. डी एन मिसाळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ व मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. स्वागत व परिचय सुरेश दुर्बिनट्टी यांनी केले.
यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या विभागाच्या अधिकार्यांचा व वनक्षेत्रपाल यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ म्हणाले, वनविभागाबरोबर प्रत्येक नागरिकाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे. शिवाय समाजात आणि वनक्षेत्रा बाबत जागृती केली पाहिजे. जिल्ह्यात 18 टक्के वनक्षेत्र आहे. त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे. त्याला अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
विजयकुमार सालीमठ हे आपल्या भाषणात म्हणाले, प्राणी पक्षी कीटक वृक्ष अशी विविधता आहे .मात्र मनुष्याकडून निसर्गातील पशुपक्ष्यांची हत्या केली जात आहे. हे वाढले तर नुकसान होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल वनसंरक्षक व कर्मचारी उपस्थित होते. साळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.