चन्नम्मा चौकातील टीजेएसबी बँकेच्या शाखेत दि. 8 रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शहर परिसरातील विविध क्षेत्रातील प्रथितयश महिलांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता भांदुर्गे, उद्योजिका मेधा बी. देशपांडे, प्रिया कवठेकर, व्यावसायिका अनघा कांबळे, एमव्हीएम इंग्लीश स्कूलच्या प्राचार्या कविता परमाणिक, तसेच स्मिता हवालदार, व्यावसायिक ज्योती लोहार, टपाल खात्याच्या महिला कर्मचारी महादेवी जत्तीन्नावर आदींचा समावेश होता. या सर्वांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तु देण्यात
आले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. अनिता भांदुर्गे म्हणाल्या की, महिलांनी आपले आरोग्य सांभाळायला हवे. त्यांनी आरोग्याविषयी काही टिप्स दिल्या.
प्राचार्या परमाणिक म्हणाल्या की, मुलांना घडविण्यामध्ये प्रथम स्त्रीचा वाटा मोठा असतो. नंतर मुलांना शिक्षण देण्याचे कार्य शाळेमध्ये शिक्षक वर्ग
करतो.
मेधा देशपांडे आणि प्रिया कवठेकर यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. शाखा व्यवस्थापक प्रमोद देशपांडे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. सहाय्यक व्यवस्थापिका सौ. स्वाती सुनील आपटे आणि सौ. सुजाता माने यांनी स्वागत केले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते बँकेतील महिला कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. सौ. आपटे व सौ. माने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.