चंदगड तालुक्यातील करंजगाव येथील जवान नितेश महादेव मुळीक ( वय २५ ) हे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. बुधवार (दि. ९) रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. या दुःखद घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकार्यांनी कळवली. बातमी समजताच करंजगावसह चंदगड तालुका शोकसागरात बुडाला आहे. नितेश मुळीक यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करंजगावात आणले जाणार आहे. करंजगाव येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आसाम येथील सीमेवर नितेश मुळीक हे ड्युटी बजावत होते. सीमेपलिकडून अतिरेक्यांनी जोरदार गोळीबार केला. यामध्ये नितेश हे शहीद झाले. नितेश हे आठ वर्षांपूर्वी मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. त्याची पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.