सहा फूट लांबीची एक मगर अनपेक्षितपणे मानवी वस्तीत घुसल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे गुरुवारी दांडेली येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर तिला सुरक्षिततपणे हलविण्यात आले.
जुना दांडेली येथील बस डेपोजवळ हा सरपटणारा प्राणी दिसल्यानंतर प्रभाग ५ मधील नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी व नगर पंचायतीच्या सदस्यांना फोन केला.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन काही रहिवाशांच्या मदतीने त्या मगरीला पकडले.
पटेलनगर येथे महिनाभरापूर्वी मगरीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू होऊनही वन विभागाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी अधिकाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मगरीच्या अचानक दिसण्याबद्दलच्या आणि मानवी वस्तीत येण्याच्या घटनेला योग्य प्रतिसाद न दिल्याबद्दल त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीलाही धारेवर धरले.
त्या हिंस्र मगरीला मानवी अधिवासापासून दूर हलवण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती रेंज फॉरेस्ट ऑफिसर अप्पासाहेब कावशेट्टी यांनी दिली आहे.
“गुरुवारी पकडलेल्या मगरीला किरकोळ दुखापत झाली होती. उपचारानंतर तिला जंगलात सोडण्यात आले,”असे ते म्हणाले.
गुरुवारी आढळलेल्या याच मगरी ने गेल्या महिन्यात पटेल नगर येथे एका व्यक्तीची हत्या केली होती की नाही हे स्पष्ट माहित नाही. रहिवासी भागात वारंवार मगरी दिसल्याने स्थानिक लोक मात्र धास्तावले आहेत.