खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक काल गुरूवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी शिवस्मारक खानापूर येथे म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरुवातीला त्रिसदस्यीय समितीचे सदस्य तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, शिवाजी पाटील, नारायण कपोलकार यांनी त्रिसदस्यीय समिती या नात्याने देवाप्पा गुरव गटाच्या गटप्रमुखांना पत्र देऊन खानापूर तालुका म ए समितीमध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी चर्चेसाठी आमंत्रण दिले. याला प्रतिसाद म्हणून देवाप्पा गुरव व गोपाळ देसाई यांनी सहिनिशी दिलेले पत्र बैठकीमध्ये सादर करून आपण केलेल्या एकीच्या संवादाची माहिती दिली.
हे ऐकून समितीचे अध्यक्ष व कार्यकारिणीने देवाप्पा गुरव गटाशी संवाद साधण्याचे अधिकार त्रिसदस्यिय समितीला द्यावेत व बिनशर्त एकीसाठी दोन्ही गटांनी बैठकीला सामोरे जावे. सन २०१८ साली विधानसभा निवडणुकीतून समिती कार्यकर्त्यांमध्ये दोन भाग पडले, तत्कालीन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचीच पूर्वी ठरल्याप्रमाणे १०-१० सदस्य घेऊन संवाद साधावा व ऐक्य राखून म ए समितीची वज्रमूठ अबाधित ठेवावी असा ठराव एकमताने करण्यात आला.
सभा चालू असतानाच सीमातपस्वी हुतात्मा कै. नागप्पा होसुरकर कुप्पटगिरी यांच्या धर्मपत्नी श्रीमती नर्मदा नागप्पा होसुरकर यांचे गुरूवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी निधन झाल्याची बातमी समजताच खानापूर म ए समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व १४ मार्च २०२२ रोजी निडगल येथे सायंकाळी ५ वाजता तालुका म ए समितीच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले .या शोकसभेला तालुक्यातील व सीमाभागातील समस्त सीमावासियानी सायंकाळी पाच वाजता निडगल येथे उपस्थित राहावे असे आवाहन करून ठराव संमत करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले, समितीच्या ऐक्या संदर्भात शिवाजी पाटील, डी एम भोसले, बाबुराव पाटील गर्लगुंजी, चंद्रकांत देसाई माजी तालुका पंचायत सदस्य, अमृत पाटील, जयराम देसाई माजी जिल्हा पंचायत सदस्य, वसंत ज्ञानोबा नावलकर, महादेव घाडी, बाळासाहेब शेलार माजी तालुका पंचायत सदस्य, विवेक गिरी, अनिल पाटील माजी नगरसेवक, विठ्ठल गुरव माजी तालुका पंचायत सदस्य, मुरलीधर पाटील, नारायण लाड, शंकरराव पाटील, पुंडलिकराव चव्हाण, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, बी बी पाटील सर यांनी आपले एकीच्या दृष्टीने आपले विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात दिगंबर पाटील म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांच्या १९९३च्या तोडग्यानुसार नवे बेळगांव वसवून सीमाप्रश्न सोडवूया हा विचार आम्ही स्वीकारल्यास खानापूर तालुका, बेळगांव तालुका व निपाणी तालुका महाराष्ट्रात समाविष्ट होऊन आमचा प्रश्न मार्गी लागेल, हा तोडगा बहुतांश सीमाभागाच्या दृष्टीने हिताचा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच सीमा चळवळीसाठी येत्या २४ तारखेला आपण समितीच्या ध्येय धोरणाशी बांधील राहून आपण निर्णय घेऊया असे म्हणाले . यावेळी नारायण कापोलकार अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान, डॉ एल एच पाटील, यशवंतराव दिगंबरराव पाटील, लक्ष्मण खेमा कसरलेकर, मल्हारी खांबले, बी एन पाटील करंबळ, परशराम इस्राम, वसंत सुतार, शंकर पाटील, मऱ्याप्पा पाटील इत्यादी उपस्थित होते.आबासाहेब दळवी यांनी आभार मानले .