छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थातच स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याचा महत्वाचा घटक म्हणजे महाराजांनी जिंकलेले तसेच बांधलेले गडकिल्ले.18 व्या शतकापर्यंत हे गडकिल्ले सुस्थितीत होते, पण कालांतराने परकीय आक्रमणाने आणि स्वकियांच्या दुर्लक्षामुळे या गडकिल्ल्यांची पडझड होत चालली आहे. बेळगावचा भुईकोट किल्ला देखील याला अपवाद नाही.यासाठीच आता दुर्गसेवक झटू लागले आहेत.
या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक शिवपाईकाचे आद्य कर्तव्य आहे. गड किल्ले संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. तर बेळगावच्या किल्ल्याची होत असलेली पडझड बेळगावच्या दुर्ग सेवकांना पाहावली नाही.
2008 पासून राजहंस गडाचे कार्य करत असताना गेली 3 ते 4 वर्षे काही दुर्ग संवर्धक आपले आद्य कर्तव्य म्हणून बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करत आहेत. आठवड्यातील एक दिवस म्हणजेच प्रत्येक रविवारी हे दुर्ग सेवक आपले कर्तव्य पार पाडत आहेत. निस्वार्थ भावनेने हे कार्य सुरू आहे.