बेळगाव :
महिला आघाडीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम महिला आघाडीच्या शनिवार खुट हॉलमध्ये कोविड नियमांचे पालन करून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीनिवास जाधव आणि डॉक्टर नाझीब कोतवाल उपस्थित होत्या.या कार्यक्रमाची सुरुवात अर्चना देसाई यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फोटो पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिलांना स्वावलंबी बनविणे,आत्मनिर्भर बनविणे, व प्रत्येक महिलेचे समाजात एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी महिला आघाडी वेगवेगळे उपक्रम हाती घेते. महिलांना मार्गदर्शन करत त्यांना ट्रेनिंग देते,काम देते. आपल्या सोसायटीच्या माध्यमातून भांडवलही पुरवठा करते,एकूणच सर्व महिला सक्षम व्हाव्या हाच महिला आघाडीचा उद्देश आहे .असे महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविकात आपले म्हणणे मांडले. तसेच गेल्या अकरा वर्षापासून हा हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याचे देखील यावेळी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणांमध्ये प्रेग्नेंसी, पिरियड मध्ये काळजी कशी घ्यावी, मासिक पाळी पुढे मागे होणे, हार्मोन्स मध्ये बदल होणे, वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत मुले होतात याबद्दल आपल्या भाषणात सविस्तर माहिती दिली. तसेच याप्रसंगी महिलांनी देखील आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन देशपांडे यांनी केले तर आभार मंजुश्री कोळेकर यांनी मांडले या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.