वेटलिफ्टिंग या क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये हालगा – बेळगाव च्या ज्या युवतीबद्दल गौरव उद्गार काढले, त्या शेतकरी कन्या असणाऱ्या शूर मराठा युवतीचा विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आर्थिक मदत देऊन सन्मान केला.
अक्षता बसवंत कामती, राहणार हालगा, बेळगाव असे त्या युवतीचे नाव असून तिने क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करून मुलींसमोर एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. क्रीडा क्षेत्रात तिने गाठलेले यश हे तिच्या अथक परिश्रम आणि ध्येयपूर्तीसाठी चाललेल्या धडपडीचे फळ असल्याचे किरण जाधव यांनी यावेळी बोलताना म्हटले.
अक्षता कामती हिने बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये 87 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहे.
मार्च 2022 मध्ये भुवनेश्वर येथील केआयआयटी युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रस्तरीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 81 किलो वजनी गटात भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली होती. आचार्य नागार्जुन युनिव्हर्सिटी गुंटूर येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर यूनिव्हर्सिटी स्पर्धेत तिने 87 किलो वजनी गटात भाग घेऊन सुवर्णपदक पटकाविले होते. कोलकत्ता येथे 2019- 20 मध्ये वरिष्ठांच्या राष्ट्रस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 81 किलो वजनी गटातही तिने भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये विशाखापटनम-आंध्रा येथे झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 81 किलो वजनी गटात भाग घेऊन तिने कांस्यपदक पटकावले होते. 2018 च्या फेब्रुवारी महिन्यात आंध्र प्रदेश मधील विशाखापटनम येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन तिने 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले होते. 2019 मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये 71 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकावले होते.
2020 मध्ये आसाम येथील गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत 81 किलो वजनी गटात भाग घेऊन तिने सुवर्णपदक मिळविले होते. 2019 मध्ये बिहारमध्ये झालेल्या बोधगया कनिष्ठ राष्ट्रस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 81 किलो वजने गटातही तिने भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. तिच्या क्रीडा क्षेत्रातील एकंदर कामगिरीची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये तिच्या या कार्यकर्तृत्वाबद्द्ल गौरवोद्गार काढले होते.
अशा या बेळगावच्या हरहुन्नरी क्रीडापटूचा भाजप नेते किरण जाधव यांनी आर्थिक मदत देऊन सन्मान केला आहे. भविष्यात ती या खेळात उल्लेखनीय कामगिरी करून ऑलिंपिक गेम्स मध्ये आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून देऊ शकते. मात्र अक्षता बसवंत कामती हिची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. प्रति महिन्याला पोषक आहार आणि सरावासाठी लागणारा तीस हजार रुपयांचा खर्च तिला न परवडणारा आहे. समाजातील दानशूर व्यक्तीनी तिच्यासाठी मदतीचा हात पुढे केल्यास नक्कीच ती ऑलिंपिक स्पर्धेत यशोशिखर गाठून बेळगावच्या शिरपेच्या मानाचा तुरा खोवेल असेही किरण जाधव यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. बँक ऑफ इंडिया, हलगा शाखेत अक्षता बसवंत कामती हीचे अकाउंट आहे. दानशूर व्यक्तीनी मदतीचा रक्कम या अकाउंटवर जमा करून तिला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.