येथील खानापूर रामनगर रस्त्यावरील मासळी मार्केट रुमीवाडी क्रॉस ते रामनगर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथील रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाचे पाणी यामध्ये साचून राहत आहेत.
तसेच या खड्ड्यांमध्ये दुचाकी अडकून अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे निदर्शनास येत नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. तसेच या खड्ड्यां बाबत अनेक राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींना सांगून देखील त्यांच्याकडून अद्यापही उत्तर मिळाले नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका यांच्यावतीने आज खानापूर तहसीलदारांना रस्ता दुरुस्त करून देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
जर ठरलेल्या वेळेत आणि तारखेच्या आत तहसीलदारांनी या रस्त्याची दुरुस्ती करून घेतली नाही तर येथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करू तसेच रुमेवाडी क्रॉस येथे वजन मिळून ठिया आंदोलन करू असा इशारा तहसीलदारांना देण्यात आला आहे.
सदर निवेदन खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून जर शासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास वृक्षारोपण आणि आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.